
पुण्यातील वाघोली येथील ग्रीन सनराईज हिल परिसरात आज सकाळी एक भारतीय हायना दिसून आला. हा हायना आईव्ही निया सोसायटी परिसराजवळ भटकताना दिसल्याने स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे.
भारतीय हायना आढळला
ग्रीन सनराईज हिल ग्रुपच्या सदस्यांनी सकाळी ७:३० वाजता या हायनाला पाहिले आणि त्याची माहिती दिली. वनविभागाला या घटनेची तत्काळ माहिती देण्यात आली असून, योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
रहिवाशांच्या मते, हा हायना जखमी असण्याची शक्यता आहे. परिसरात भटकणाऱ्या मोकाट कुत्र्यांनी (Stray Dogs) त्याच्यावर हल्ला केला असावा, असे अंदाज व्यक्त केले जात आहेत.
रहिवाशांना सतर्कतेचा इशारा
ग्रीन सनराईज हिल हा परिसर फिटनेस प्रेमी आणि नियमित मॉर्निंग वॉक करणाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. हा हायना वाघोली भागात पहिल्यांदाच दिसला असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. नागरी वसाहतीजवळ वन्यजीवांचे अस्तित्व वाढत असल्याचे हे संकेत असल्याचे काही पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. वनविभाग यावर काय कारवाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




