महानायक अमिताभ बच्चन गेल्या सहा दशकांपासून सिनेइंडस्ट्रीत सक्रिय आहेत. ते ८२ वर्षांचे झाले आहेत. ज्या वयात लोक निवृत्ती घेऊन घरी विश्रांती घेतात, त्या वयातही ते लोकांचे मनोरंजन करत आहेत. बिग बी कामात कितीही व्यग्र असले तरी सोशल मीडियासाठी वेळ काढायला विसरत नाहीत. ते रोज आपल्या ब्लॉगवर आणि सोशल मीडिया अकाउंटवर व्यक्त होत असतात. पण, शुक्रवारी त्यांनी अशी एक पोस्ट केली ज्यामुळे त्यांचे चाहते अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी रात्री केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे.

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. बरेचदा ते त्यांचे फोटो पोस्ट करतात. काही वेळा ते अशा क्रिप्टिक पोस्ट करतात, ज्यामुळे चाहत्यांना त्यांची काळजी वाटू लागते. त्यांनी शुक्रवारी केलेली पोस्ट अशीच आहे. अमिताभ बच्चन यांनी ७ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३४ वाजता एक्सवर एक पोस्ट केली. त्यात ‘जाण्याची वेळ झाली आहे,’ असं त्यांनी लिहिलं आहे. अमिताभ यांनी ही पोस्ट करताच सोशल मीडियावर लोक त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करू लागले.