
परभणीतील हिंसाचारानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ परभणी ते मुंबईपर्यंत लॉन्ग मार्च काढण्यात आला होता. मात्र, भाजप आमदार सुरेश धस आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी नाशिक येथे मध्यस्थी केली आणि लॉन्ग मार्च स्थगित केला. यावेळी सुरेश धस यांनी म्हटले होते की, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील गुन्हे दाखल करण्याची मागणी संयुक्तिक होणार नाही. सोमनाथ सूर्यवंशी यांना ज्या पोलिसांना मारले, त्यांना एक संधी द्या, त्यांना माफ करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करू नका.
सुरेश धस यांच्या या वक्तव्यावरून दमानिया, वडेट्टीवार तसेच जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. दरम्यान आक्रमक झालेल्या भीम आर्मीने सुरेश धस यांच्यावर तात्काळ ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावर अंजली दमानिया यांनी म्हटले की, सोमनाथ सूर्यवंशी यांची एवढ्या दुर्दैवी पणे हत्या झाली. यात जे जे अधिकारी दोषी असतील त्यांना नुसते सस्पेन्शन नको, त्यांना कायमचे घरी बसवा, गुन्हे दाखल करा.
दमानिया पुढे म्हणाल्या, सुरेश धस यांचा दुटप्पीपणा दोन्ही केसेस मध्ये दिसतो. जेव्हा संतोष देशमुख केसमध्ये बोलतात तेव्हा म्हणतात सातपुडा बंगल्यातून खंडणीचा तीन कोटींचा व्यवहार झाला. काल म्हणत होते धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी माझी नाही. सूर्यवंशी केस प्रकरणांमध्ये एकीकडे लॉन्ग मार्चमध्ये जातात, दुसरीकडे म्हणतात पोलिसांच्या विरोधात कुठलाही गुन्हा दाखल करू नका. ही दुटप्पी भूमिका कुठेतरी भाजपच त्यांच्याकडून वधवून घेत आहे का अशी शंका येऊ लागली आहे, असे दमानिया म्हणाल्या.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत, पोलिसांनी खून केला आहे, कोणीही सुटता कामा नये. सुर्यवंशी मारले गेले आहेत, सुरेश धस यांनी पांघरून घालू नये.