
विजापूर: पूर्ववैमनस्यातून गँगस्टर भागप्पा हरीजनची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी हरीजनला आधी गोळी मारली. यानंतर धारदार शस्त्रांनी चेहरा आणि शरीरावर निर्दयीपणे वार केले.
मिळालेल्या माहितीनुसार, गँगस्टर भागप्पा हरीजन हा विजापूर शहरातील मदिनानगर परिसरात भाड्याच्या घरात आपल्या कुटुंबासह राहत होता. मंगळवारी (दि.११) रात्री १० वाजताच्या सुमारास जेवण झाल्यानंतर तो घरासमोर शतपावली करत होता. याचवेळी रिक्षातून आलेल्या काही अज्ञातांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला.
हल्लेखोरांनी हरीजनला आधी गोळी मारली. त्यानंतर हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्याच्या चेहरा आणि शरीरावर निर्दयीपणे वार केले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस हल्लेखोरांची ओळख पटवत असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
सोलापूरातील धोत्रे गावात २००० साली पोलिसांनी गुंड चंदप्पा हरीजनचा एन्काऊंटर केला होता. या एन्काऊंटरनंतर भागप्पा हरीजनने थेट पोलिसांवरच गोळीबार केला होता. यानंतर तो अनेक गुन्ह्यात सहभागी झाला होता. गँगस्टर भागप्पा हरीजनवर खून, दरोडा, खंडणी, धमकी देणे अशाप्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत.



