
चांदखेड : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांच्या न्यू इंग्लिश स्कूल, चांदखेड येथे मुख्याध्यापक आजिनाथ ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा करून, ढोल ताशांच्या गजरात अश्वारूढ शोभायात्रा काढली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सत्यवान पवार यांनी भूषवले. कार्यक्रमाचे नियोजन आठवीच्या विद्यार्थ्यांनी, वर्गशिक्षिका सौ. माधवी फापाळे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. सरला भोये यांनी केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव करत भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. त्यात गाणी, नृत्य आणि नाटकाद्वारे शिवाजी महाराज यांच्या शौर्य, नेतृत्व आणि समाजकल्याणाची शिकवण उपस्थितांना दिली. विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाने कार्यक्रम अत्यंत आकर्षक व प्रेरणादायक ठरला.
शिवजयंतीच्या या कार्यक्रमाने विद्यालयात एक वेगळा आदर्श निर्माण केला असून, विद्यार्थ्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल अधिक श्रद्धा निर्माण होईल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.
