नवी दिल्ली : कोविड-१९ मुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांना बरे झाल्यानंतर अडीच वर्षांपर्यंत मृत्यू किंवा अवयवसंबंधित विकारांचा धोका वाढतो, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. यापूर्वी अभ्यासात असे आढळले आहे की दीर्घकाळापर्यंत कोविड असलेल्या सुमारे ६० टक्के रुग्णांमध्ये अवयवांना हानी पोहचते, तसेच तीव्र संसर्गातून बरे झाल्यानंतरही काही काळ थकवा जाणवत राहतो.
पॅरिसच्या बिचॅट हॉस्पिटलमधील संशोधकांच्या नेतृत्वाखालील अभ्यासात सुमारे ६४ हजार फ्रेंच नागरिकांवर करण्यात आलेल्या अभ्यासात असेही आढळून आले की, कोविड-१९ साठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना कोणत्याही कारणामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यांना कोविडमधून बरे झाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव रुग्णालयात दाखल केले जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामध्ये विशेषत: न्यूरोलॉजिकल, मानसिक, हृदय व रक्तवाहिन्या आणि श्वसन समस्यांसंबंधी सर्वांत जास्त धोका असतो.
पुरुषांच्या तुलनेत महिलांना मानसिक कारणांमुळे रुग्णालयात दाखल होण्याचा धोका जास्त असल्याचे आढळून आले आहे. मानसिक आजार वगळता रुग्णालयात दाखल होण्याच्या संख्येमध्ये पुरुष आणि स्त्रिया यांच्यात कोणताही फरक नव्हता. एकदा कोविड-१९ संसर्गाने रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांसाठी सतत आरोग्यसेवा आणि सतर्क राहण्याची गरज असल्याचे शेवटी अभ्यासात म्हटले आहे.



