आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस होता. यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी तानाजी सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केलं. दरम्यान, तानाजी सावंत यांच्या कार्यकाळातील तब्बल ३१९० कोटींच्या कामांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याची चर्चा आहे. या चर्चांवर आज तानाजी सावंत यांनी भाष्य केलं आहे. तसेच अशा पद्धतीने कोणत्याही गोष्टीला राज्याच्या मंत्रिमंडळाने किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती दिलेली नाही, असं स्पष्टीकरण तानाजी सावंत यांनी दिलं आहे.
तानाजी सावंत काय म्हणाले?
तानाजी सावंत यांना महायुतीच्या सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. यावरून ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत तानाजी सावंत यांना प्रश्न विचारला असता ते म्हाणाले, “मी नाराज किंवा खूश असा कोणताही भाग नाही. पक्षाने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडणं आपलं काम असतं. आता एक जबाबदारी संपली असली तरी माझ्या दुसऱ्याही जबाबदाऱ्या भरपूर आहेत. त्यामुळे मी कोणतीही जबाबदारी टाळली असं होत नाही”, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं.
आरोग्य विभागाच्या कामांच्या स्थगितीबाबत सावंत काय म्हणाले?
“गेल्या दोन दिवसांपासून जो कामांच्या स्थगितीबाबत विषय सुरु आहे. त्या विषयाची खरं तर माहिती घेणं गरजेचं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी चर्चा केली आहे. त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टीला मंत्रिमंडळाने किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिलेली नाही. आता ३१९० कोटींचा घोटाळा झाला, त्याआधी १०८ गाड्याच्या बाबतीत १० हजार, १२ हजार कोटींचा घोटाळा झाला असे आरोप झाले. मात्र, यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीतून एक रुपयाही कुठे गेलेला नाही. पण अभासी जगात जगायचं आणि घोटाळे झाले म्हणायचे आणि एखाद्याला बदनाम करायचं हे चुकीचं आहे. मी आरोग्यमंत्री असताना न भूतो न भविष्यति असे तब्बल २४ महिन्यांत ४२ निर्णय आरोग्य विभागात घेतले आहेत”, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.



