मुंबई : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिकवेशनाचा आजच्या पहिल्या दिवशीच विरोधक कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आक्रमक झाले होते. बनावट कागदपत्रांचा वापर करून सदनिका लाटण्याच्या प्रकरणात कोर्टाने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्ष कारावास, आणि 50 हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे. नियमानुसार, कोकाटे यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मात्र, आज विरोधकांच्या गोंधळानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार देत कोकाटे यांची पाठराखण केली.
विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहाला उत्तर देताना म्हणाले की, देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते, या देशामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा केल्या अशा मनमोहन सिंग यांच्या शोक प्रस्तावाच्या दिवशी असा गोंधळ होईल असे वाटले नव्हते.
दरम्यान, माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून मिळणार्या सदनिका कोकाटे बंधूंनी घेतल्या होत्या. त्यांनी आमचे उत्पन्न कमी आहे, आम्हाला दुसरे घर नाही अशी माहिती शासनाला दिली होती. यासाठी बनावट कागदपत्र दिले होते.
माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार केल्यानंतर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणात एकूण चार आरोपी होते. कोर्टाने उर्वरित दोघांना शिक्षा सुनावलेली नाही. फक्त माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.


