चिंचवडगाव येथील तालेरा रुग्णालयाच्या नव्या इमारतीमध्ये सध्या बाह्यरुग्ण विभाग सुरू आहे. या इमारतीत सुरुवातीला आंतररुग्ण विभागासाठी ५० खाटांची सोय केली आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य विभाग सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना उपचारासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
तालेरा रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. २५० खाटांचे हे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय बांधले आहे. तालेरा रुग्णालयाची नवीन इमारत पाच मजली आहे. पहिल्या मजल्यावर बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. येथे रक्त तपासणीसाठी नमुने घेतले जात आहेत. क्ष-किरण आणि सोनोग्राफीची सुविधा जुन्या इमारतीत उपलब्ध आहे.
या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात अडीचशे खाटा असून सर्व सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. इतर विभागांमध्ये अद्याप यंत्रसामग्री नाही. त्यामुळे हे विभाग सुरू व्हायचे आहे. त्यामुळे २५० खाटांचे हे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय पूर्ण क्षमतेने कधी सुरु होणार? असा सवाल शहरातील नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
तालेरात सध्या बाह्यरुग्ण विभाग सुरू केला आहे. येथे प्रथम ५० खाटांचा आंतररुग्ण विभाग सुरू केला आहे. २५० खाटांचे हे मल्टिस्पेशालिटी असे रुग्णालय बांधले आहे. पुढील विभागातील यंत्र-सामुग्री आणल्यानंतर लवकरच सुरु होतील.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, वैद्यकीय अधिकारी, महापालिका




