मुंबई : सरकार स्थापनेनंतर तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे विधानसभा गटनेते भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस केली. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना यासंदर्भातील पत्र दिले. शिवसेनेच्या पत्रानंतर आता विधानसभा अध्यक्ष कोणता निर्णय घेतात याची उत्सुकता असेल.
विरोधी पक्षनेतेपदासाठी आमदारांच्या आकडेवारीचा कोणताही नियम नसल्याचे विधिमंडळ सचिवालयाने स्पष्ट केल्याने जाधव यांच्या नावाची घोषणा करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. विधानसभेच्या एकूण जागांपैकी १० टक्के म्हणजे २८ इतक्या जागा विरोधी बाकावरील कोणत्याही पक्षाला न मिळाल्याने विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय प्रलंबित होता. विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळाची अट नसल्याची माहिती विधिमंडळ सचिवालयाकडून देण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा झाला. महाविकास आघाडीकडून शिवसेनेला (ठाकरे) विरोधी पक्षनेतेपद देण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेतेपदासाठीची शिफारस विधानसभा अध्यक्षांना दिली.
विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेतेपदसाठी भास्कर जाधव यांच्या नावाची मागणी केली आहे. आम्हाला खात्री आहे लोकशाही मूल्यांचे पालन करून लवकरात लवकर यावर निर्णय होईल. अर्थसंकल्प सादरीकरणाआधी विरोधी पक्षनेतेपदीची निवड केली जाईल. विरोधी पक्षनेतेपदासाठी अडीच – अडीच वर्षांचा कोणतेही सूत्र नाही.
:-उद्धव ठाकरे,शिवसेना पक्षप्रमुख



