कर्जत : 18 मार्च 2025 पासून माथेरान बेमुदत बंद सुरु होता. पर्यटकांची फसवणुक थांबवण्यासाठी माथेरानकर एकवटले आणि त्यांनी माथेरान बंद कची हाक दिली होती. अखरे माथेरान बंद मागे घेण्यात आला. यामुळे पर्यटकांना मोठा दिलासा आहे. तसेच पर्यटकांची फसवणुक थांबवण्यासाठी देखील मोठा निर्णय घेण्यात आला.
माथेरानमधील प्रवेशद्वारापासून पर्यटकांची फसवणुक सुरु होते. दस्तुरी नाक्यावर काही घोडेवाल्यांकडून पर्यटकांची दिशाभूल करत फसवणूक केली जाते. याला आळा घालण्यासाठी माथेरानकरांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला मात्र त्याला यश न आल्यामुळे अखेर माथेरान बचाव संघर्ष समितीने माथेरान बंदचे हत्यार उपसले होते. माथेरान प्रशासन फसवणुकीचे धंदे बंद करत नाहीत तोपर्यंत माथेरान बेमुदत बंदचे आवाहन करण्यात आले होते.
अखेर माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने आपला बंद मागे घेतला असून माथेरानमधील सर्व व्यवहार पुन्हा सुरळीत सुरू झाले आहेत. बंद असलेले माथेरान पुन्हा पर्यटकांसाठी खुले झाले आहे. माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या फसवणूकीमुळे माथेरान बदनाम होतंय. इथला व्यवसाय संपत चालला आहे. याला विरोध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला होता.




