मुंबई : नागपुरात झालेल्या हिंसाचाराच्या चर्चेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर विशेषत: शिवसेना उबाठा गटावर जोरदार टीका केली. औरंगजेबी विचार या लोकांनी सत्तेसाठी स्वीकारले. औरंगजेब हा महाराष्ट्राला लागलेला कलंक असून तो पुसण्यासाठी लोक आंदोलन करत आहेत. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं महाराष्ट्र सहन करणार नाही, असं सांगतानाच ठाकरे शिवसेनेच्या प्रमुखांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि माफी मागितली होती. तेथे जाऊन माफी मागितली मात्र, राज्यात परत येऊन पलटी मारली, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता केली.
काय म्हणाले एकनाथ शिंदे? : नागपुरात झालेल्या दंगलीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदन दिलं. त्यावेळी शिंदे यांनी विरोधकांवर कडाडून हल्लाबोल केला. ते म्हणाले, हा औरंगजेब लागतो कोण? औरंगजेब हा महाराष्ट्राचा घास घ्यायला आला होता. तो लुटारू होता. तो आला त्यावेळी त्याने हिंदुंची मंदिरं पाडली. कोणी म्हणाले की, तो उत्तम प्रशासक होता. त्याची छत्रपती शिवाजी महाराजांशी काहींनी बरोबरी केली होती. त्यावेळी खालच्या सभागृहात अबू आझमीला मी उत्तर दिलं होतं. औरंगजेब हा स्वराज्यावर चाल करुन आलेला. निष्पाप लोकांचे बळी घेतले. रक्ताचे पाट वाहिले. अशा आौरंग्याचं उदात्तीकरण थांबवावं, म्हणून जे लोक मागणी करत आहेत, विश्व हिंदू परिषद असेल किंवा इतर कोणी असेल, त्यांची मागणी चुकीची नाही. तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याकुब मेमन याची कबर सजवली, तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशी टीका शिंदे यांनी केली. आतापर्यंतच्या इतिहासात अनेक देशांनी आक्रमकांच्या खुणा पुसून टाकल्या. ज्यांनी शौर्य गाजवलं, त्यांच्या खुणा ऊर्जा आणि प्रेरणा घेण्यासाठी ठेवल्या. आपण व्हिक्टोरिया टर्मिनसचे, विमानतळाचे नाव बदलले. किंग एडवर्डचा पुतळा काढला. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नाव केलं, अहमदनगरचं अहिल्यानगर आणि उस्मानाबादचं धाराशीव केलं, असं शिंदे म्हणाले.
माफी मागितली आणि परत येऊन पलटले : औरंग्याचं उदात्तकरण केलं, त्यांना निलंबित केलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. तुमचा छळ झाला का, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी अनिल परब यांना केला. त्यावेळी परब आणि शिंदे यांच्यात खडाजंगी झाली. यावेळी शिंदे म्हणाले, “खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले आणि औरंगजेबाचे विचार धरले. म्हणून या हिंदुत्वावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही काँग्रेसबरोबर जाऊन २०१९ मध्ये सत्ता मिळविली. हे गेले होते, लोटांगण घालून आले आणि मला वाचवा, मला वाचवा, असं म्हणाले. पण, परत येऊन पलटी मारली. यांचे प्रमुख देखील गेले. एक अंदर की बात सांगतो, यांचे प्रमुख पंतप्रधान मोदी यांना भेटले. मला माफ करा, म्हणाले. आम्ही पुन्हा येतो म्हणाले. तिकडं म्हणाले, आम्ही युती सरकार स्थापन करू. पण, इकडं आल्यावर पलटी मारली. नोटीस आली म्हणून तुम्हीपण गेले होते. पण, आम्ही जे केलं ते खुले आम केलं”.
तुमचा टांगा पलटी केला : “देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, आशीष शेलार आणि प्रविण दरेकर या चौघांना तुरुंगात टाकणार होते. त्यांना तुरुंगात टाकून मविआ सरकारमध्ये भाजपाचे आमदार घेणार होते. तुम्ही औरंगाजेबी विचार स्वीकारले. त्यावेळी मी यांचं नाव फोडून यांचा टांगा पलटी केला आणि महायुतीचं सरकार आणलं. हे करायला वाघाचं काळीज लागतं. लांडगा वाघाचे कातडे पांघरून वाघ होऊ शकत नाही. त्याला वाघाचं काळीज लागतं. ये शेर का बच्चा है. खुले आम किया, तुम्हारे में हिंमत है? जनता ने तुम्हे जगह दिखा दी. तुम्हाला मी धाडस दाखवलं. शिवसेना वाचविली. तुम्ही १०० पैकी २० जिंकून आणले, मी ८० पैकी ६० जिंकून आणले,” असं शिंदे म्हणाले.



