पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने मिळकतकर संकलनामध्ये वाढ होण्यासाठी राबविलेल्या विविध उपाययोजनांची राज्य सरकारने दखल घेतली आहे. महापालिकेला राज्य सरकारच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार व दहा लाखांचे बक्षीस मिळाले आहे.
मिळकतकर हा महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्राोत आहे. करसंकलन करण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. विनानोंद, करकक्षेत नसलेल्या मिळकती शोधून करप्रवाहात आणल्या आहेत. मिळकतकर वाढीसाठी ऑनलाइन सुविधा, मिळकत जप्ती, लिलाव प्रक्रिया, मिळकतींचे जिओ सिक्वेन्सिंग, प्रत्येक मिळकतीसाठी विशेष ओळख क्रमांक या उपाययोजना केल्या. त्यामुळे करसंकलन वाढून महापालिकेचे उत्पन्नही वाढले.
याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेसाठी पाठवला होता. त्यानंतर राज्यस्तरीय निवड समितीकडून या प्रस्तावाची दखल घेऊन मिळकतकरवाढीसाठी केलेल्या उपाययोजनांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेला शासनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार व दहा लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.
करसंकलन विभागाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे करसंकलनामध्ये विक्रमी वाढ झाली. सन २०२१-२२ मध्ये ६२८ कोटी, २०२२-२३ मध्ये ८१६ कोटी आणि २०२३-२४ मध्ये ९७७ कोटींची विक्रमी करवसुली झाली. या विभागाचे तत्कालीन सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी करवाढीसाठी विविध उपाययोजना केल्या. त्यांच्या कामाची दखल घेऊन शासनाने अधिकारी संवर्गातील दुसऱ्या क्रमाकांचे ३० हजार रुपयांचे पारितोषिक त्यांना जाहीर केले.
करसंकलन विभागाने राबवलेल्या उपाययोजनांची दखल घेऊन राज्य सरकारने दिलेला पुरस्कार ही अभिमानाची बाब आहे. आगामी काळात मिळकतकर वसुलीसाठी आणखी व्यापक मोहीम राबवली जाईल.
प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका



