कोल्हापूर : विधानसभा निवडणूक होऊन साडेतीन महिने उलटल्यानंतर कोल्हापुरातील महाविकास आघाडीतील मतभेदाने उचल खाल्ली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने कागल, चंदगड विधानसभा मतदारसंघात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मदत केली नाही, असा हल्ला पक्ष मेळाव्यात चढवण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा येथे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतील घडामोडीसंबंधी काँग्रेस पक्षाकडे नाराजी व्यक्त करतानाच मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली. शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी थेट नाव न घेता मुश्रीफ यांच्यावर टीका केली.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी कागलमध्ये सभा घेतली नाही. त्यांनी चंदगडमध्ये अप्पी पाटील यांना निवडणुकीतून माघार घ्यायला सांगायला हवे होते. गोपाळराव पाटील यांनी नंदा बाभूळकर यांना मदत केली नाही. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतलबी कारभारामुळेच गडहिंग्लज कारखाना, तालुका संघ, बाजार समिती यांची दुरवस्था झाली, अशी टीका जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजी खोत, कागल तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी केली.



