नागपूर : महाराष्ट्र व काश्मीरचे भाषिक, सांस्कृतिक ऋणानुबंध समृद्ध करण्यासाठी काश्मीर येथील बांदीपूर जिल्ह्यातील अरागाम येथे पुस्तकांचे गाव उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या पुस्तकांच्या गावात मराठी पुस्तके लक्षणीय संख्येत असतील. या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला असून त्या संदर्भातील पहिली बैठक गुरुवारी मुंबईत पार पडली.
काश्मिरातील तरुणांना विधायक दिशेने वळवता यावे व पुस्तकांद्वारे त्यांच्यात सकारात्मक विचार रुजावे. तसेच महाराष्ट्रातून जाणाऱ्या पर्यटकांना काश्मिरात मराठीचे हे ‘पुस्तक वैभव’ अनुभवता यावे व त्याद्वारे पर्यटनाचे प्रमाण वाढवणे. महाराष्ट्रात शिकलेल्या काश्मिरी युवकांना या उपक्रमाद्वारे त्यांच्या गावात रोजगार मिळावा, असा या उपक्रमामागचा उद्देश आहे.
या उपक्रमाच्या नियोजनाबाबत मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात मुंबईत बैठक झाली. या बैठकीला मराठी भाषा विभागाचे सचिव, सहसचिव, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक, पुण्यातील सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. या पुस्तकांच्या गावात नेमकी कुठली पुस्तके ठेवावी, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी सरहद या संस्थेच्या मदतीने एक समिती स्थापन केली जाणार आहे.
उद्यान, बुक ऑन व्हील…
अरागाम येथील या पुस्तकांच्या गावात सर्वच भाषेतील उत्तमोत्तम पुस्तके असतील, पण त्यात मराठी पुस्तकांची संख्या लक्षणीय असेल. सोबतच मराठी लेखकांची इतर भाषेत अनुवादित झालेली पुस्तकेही या ठिकाणी वाचायला मिळणार आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पुस्तकांचे उद्यान, बुक ऑन व्हील, अशा अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी या पुस्तकाच्या गावात निर्माण केल्या जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.



