
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पाच कोटींचा खासदार निधी मिळतो. खासदार निधीतून एका मिनिटात रस्त्याला मंजुरी देता येते, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुळे यांना टोला लगविला.
खासदार सुळे यांनी भोर येथील बनेश्वरच्या सहाशे मीटर रस्त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी उपोषण केले. याबाबत पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, ‘भोरमधील बनेश्वरचा रस्ता केवळ सहाशे मीटर आहे. आमदार शंकर मांडेकर यांनी या रस्त्याचा प्रश्न मांडला आहे. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. हा रस्ता फार मोठा नाही. पीएमआरडीए, जिल्हा परिषद किंवा जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हा रस्ता करण्यात येणार आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
आज लोकप्रतिनिधींनी ज्या रस्त्यासाठी आंदोलन केले, त्या रस्त्यासंबंधीचा प्रश्न राष्ट्रवादीच्या बैठकीत कालच चर्चिला गेला. भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी रस्त्याबाबतचा आग्रही मुद्दा मांडला. मी देखील त्यावर सकारात्मक होतो, लगोलग आदेशही दिले आहेत. काम लगेच चालू होईल. २ तारखेची वाट बघणार नाही. आधीच्या आमदारांनी (संग्राम थोपटे) यात अजिबात लक्ष घातले नाही. त्यामुळे जनरेट्याच्या पार्श्वभूमीवर शंकर मांडेकरांना हा विषय तातडीने हाती घ्यावा लागला.
पण हा रस्ता अवघा ६०० मीटरचा आहे आणि रस्ता व्हावा ही इच्छाच असेल तर खासदार निधीतून तो रस्ता करता येऊ शकतो. मी गेली ३५ वर्षे राजकारण करतोय. पण ६०० मीटरच्या रस्त्यासाठी खासदारांचे उपोषण…? असा मिश्किल सवाल उपस्थित करत अजित पवार म्हणाले, आमदार आणि खासदारांना दरवर्षी ५ कोटींचा विकासनिधी मिळतो. ५०-६० लाख रस्त्याला लागले असते. जर रस्ता व्हावा ही इच्छाच असती तर त्यांनाही करता आला असता. अशा शब्दात अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.
सात तासांनंतर सुप्रिया सुळेंनी उपोषण सोडलं
भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या पवित्र देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी वारंवार पाठपुरवठा करुनही शासन आणि प्रशासन दुर्लक्ष करत आहे. शासनाच्या या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत सुळे यांनी आंदोलन छेडलं होते. जोपर्यंत संबंधित रस्त्याच्या कामाची तारीख सांगत नाही, तोपर्यंत उपोषण सुरु राहणार असल्याचे सुळे यांनी सांगितले होते. अखेर त्यांनी 2 मे ला कामाला सुरुवात करण्याच्या लिखित आश्वासनानंतर सुप्रिया सुळे यांनी उपोषण सोडले.



