![]()
मुंबई : असं म्हणतात की 30 वर्षांपूर्वी मुंबईत रोज गँग वॉर, खुलेआम गोळीबार, खंडणीच्या घटना होत होत्या. यावर उपाय म्हणून मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर आले आणि त्यांनी इथल्या टोळ्या संपवल्या. पण आता पुन्हा एकदा मुंबईत खुलेआम गोळीबार करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, बुधवारी रात्री चेंबूर परिसरात गोळीबार झाल्याची घटना समोर आली.
व्यावसायिकावर केला गोळीबार : मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री चेंबूर परिसरातील डायमंड गार्डनजवळ दोन दुचाकीस्वारांनी व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळ्या झाडल्याची घटना समोर आली आहे. भर रस्त्यात गोळीबार केल्याच्या या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. ही घटना रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
“रात्री १० वाजण्याच्या सुमारास डायमंड गार्डन सिग्नलवर गोळीबाराची घटना घडली आहे. सिग्नलवर एक कार थांबली तेव्हा दोन दुचाकीस्वारांनी कारमधील व्यक्तीवर गोळीबार केला. जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते आता धोक्याबाहेर आहेत.” – नवनाथ ढवळे, डीसीपी झोन ६
आरोपींचा शोध सुरू : आता सदरुद्दीन खान यांची प्रकृती सध्या स्थिर असून, घटनेची माहिती मिळताच चेंबूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचून याचा अधिक तपास करत आहेत. परिसरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी म्हटलं. सध्या पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली असून, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. या घटनेचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.



