
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णालयासमोर धर्मादाय रुग्णालय असल्याबाबतचे माहितीचे फलक लावावेत, अशा सूचना देऊन त्याबाबतचा अहवाल दोन दिवसांत पाठविण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी रुग्णालयांना दिले आहेत.
‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत गुरुवारी चिंचवडमधील ऑटो क्लस्टर येथे शहरातील महिलांच्या ९० तक्रारींचा निपटारा करण्यात आला. महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्या उपस्थितीत महिला समस्यांबाबत पोलीस, महापालिका आणि विविध सरकारी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत सुनावणी घेण्यात आली. पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपायुक्त संदीप खोत, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप या वेळी उपस्थित होते.
चाकणकर म्हणाल्या, ‘शासकीय, शिक्षण संस्थांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती असणे आवश्यक आहे. शहरातील महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या या समितीमार्फत सोडविल्या जातील. तसेच, त्यांचा अहवाल महिला आयोगाकडे सादर करणे आवश्यक आहे. औद्याोगिक शहर असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील महिला कंत्राटी कामगारांच्या समस्या वेगळ्या आहेत. वेतनाबाबतच्या काही तक्रारी आहेत. त्या सोडविल्या जातील.
