
मुंबई : जागतिक पातळीवर अमेरिका आणि जपानदरम्यान सुरू असलेल्या व्यापार शुल्कासंबंधित वाटाघाटींमध्ये यश मिळण्याची अपेक्षा व देशांतर्गत भांडवली बाजारात परदेशी गुंतवणूकदार पुन्हा परतल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण होते. प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स व निफ्टीने गुरुवारच्या सत्रात २ टक्क्यांची वाढ नोंदवली. गुंतवणूकदारांना अमेरिका आणि जपानमध्ये व्यापार शुल्कांवरील सुरू असलेल्या वाटाघाटींमधून सकारात्मक निकालाची अपेक्षा आहे. दोन्ही देश सध्या व्यापार शुल्कांबाबत चर्चेत गुंतले आहेत, शक्य तितक्या लवकर सकारात्मक निर्णयापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,५०८.९१ अंशांनी म्हणजेच १.९६ टक्क्यांनी वधारून ७८,००० अंशांची महत्त्वपूर्ण पातळी पुन्हा ओलांडली. सेन्सेक्स अखेर ७८,५५३.२० पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने १,५७२.४८ अंशांची कमाई करत ७८,६१६.७७ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ४१४.४५ अंशांची भर घालत (१.७७ टक्के) २३,८५१.६५ अंशांची पातळी गाठली. गेल्या चार सत्रांत सेन्सेक्स ४,७०६.०५ अंशांनी म्हणजेच ६.३७ टक्क्यांनी वधारला आणि निफ्टी १,४५२.५ अंशांनी वधारला आहे.
बचत ठेवींच्या व्याजदरांमध्ये कपात केल्यामुळे बँकांच्या ताळेबंदावर त्याचे सकारात्मक पडसाद उमटण्याची शक्यता आहे. परिणामी, बँकांसह निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या कंपन्यांच्या समभागांमध्ये जोरदार तेजी दिसून आली. जागतिक पातळीवर अनिश्चिततेचे वातावरण असूनही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा भारतीय भांडवली बाजाराकडे मोर्चा वळवला. आता अमेरिका-भारत व्यापार वाटाघाटींमधून अनुकूल निकालाची अपेक्षा आहे.
