नागपूर : निवडणुकीत घोळ झाल्याची शंका व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झाली आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने फडणवीस यांना समन्स बजावत ८ मेपर्यंत जबाब नोंदवण्याचे आदेश दिले.
नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून फडणवीस यांनी विजय प्राप्त केला होता. फडवीस यांच्या विरोधात उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी ही याचिका दाखल केली असून, फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्याची विनंती केली आहे. या याचिकेवर गुरुवारी न्यायालयाने फडणवीस यांना समन्स बजावला. फडणवीस यांच्या व्यतिरिक्त दक्षिण नागपूरचे भाजप आमदार मोहन मते, चिमूरचे आमदार कीर्ती भांगडिया यांनाही समन्स बजावला.
‘ईव्हीएम’द्वारे निवडणूक घेण्यापूर्वी कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता निवडणूक आयोगाने केली नाही. ईव्हीएमने निवडणूक घ्यायची असल्यास काही निकष आहेत, काही कारणेही स्पष्ट करावी लागतात, तेसुद्धा केले नाही, असा आरोप याचिकाकर्ते गुडधे यांनी याचिकेत केला आहे. निकालानंतर पराभूत उमेदवारांनी मागणी केल्यानंतरही ‘सीसीटीव्ही’चे चित्रण, फॉर्म नंबर १७ दिले जात नाही. पाच व्हीव्हीपॅटची फेरमोजणी करण्यास मान्यता आहे. अनेकांनी याकरिता पैसे भरले आहेत. मात्र, व्हीव्हीपॅटची मोजणीसुद्धा केली जात नाही, असेही याचिकेत नमूद आहे.
मुनगंटीवार यांच्याविरोधातही याचिका
भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार, देवराव भोंगळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोज कायंदे यांनाही उच्च न्यायालयाने समन्स पाठवले असून तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मुनगंटीवार यांच्याविरुद्ध संतोषसिंग रावत (काँग्रेस), राजुरा येथून जिंकलेले भोंगळे यांच्याविरुद्ध सुभाष धोटे (काँग्रेस) तर, सिंदखेडराजा येथून विजयी झालेले कायंदे यांच्याविरुद्ध डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) यांनी याचिका दाखल केली आहे.



