सण-उत्सव असो… की महापुरुष जयंती… नेत्यांचे वाढदिवस असोत की दौरे… त्याकरिता फ्लेक्सबाजी पाहिजेच… छोट्या-मोठ्या व्यावसायिक जाहिरातींचे तर बोलायलाच नको… विशेष म्हणजे, कोणत्याही प्रकारचे फलक लावण्यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी आवश्यक असते. मात्र, पालिकेला फाट्यावर मारत विनापरवाना फ्लेक्स लावून शहर विद्रुप करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. या विद्रुपीकरणापुढे पालिकेने आणि पालिका आयुक्तांनी हात टेकले आहेत. आता हे विद्रुपीकरण थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दोन खासदार, पाच आमदारांसह राजकीय पक्षांच्या शहराध्यक्षांना पत्र दिले आहे. शहर विद्रुप होऊ नये, याकरिता बेकायदेशीर फ्लेक्स, बॅनर लावण्यास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना कराव्यात, अशी विनंती पत्राद्वारे केली आहे.
राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते विनापरवाना फलक लावून चमकोगिरी करतात. गल्लोगल्ली फ्लेक्स, बॅनर लावून नागरिकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जातो. मुख्य आणि अंतर्गत रस्ते, चौकाचौकात, सिग्नल, शाळा-काॅलेज परिसर अशा प्रत्येक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स लागल्याने शहराचे सौंदर्य नष्ट होते आहे. यामुळे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन होत आहे. सण-उत्सव, विविध महापुरुषाच्या जयंतीनिमित्त राजकीय पक्षांनी शहरभर अनधिकृत बॅनर, पोस्टर्स आणि होर्डिंग लावून शहर विद्रुप करण्याचा सपाटा लावला आहे. शहरात विनापरवाना जाहिरात फलक लावण्यास बंदी आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदेशीर फ्लेक्स हटवण्यात येत आहेत. पालिकेला गुन्हा दाखल करण्याचा अधिकारदेखील आहे. या विद्रुपीकरणाला काही केल्या पायाबंद घालण्यात यश येत नसल्याने हतबल झालेल्या महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दोन खासदार, पाच आमदारासह पक्षाच्या शहराध्यक्षांना पत्र देत शहराचे विद्रुपीकरण होऊ नये, याकरिता बेकायदेशीर फ्लेक्स, बॅनर न लावण्यासंदर्भात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना देण्याची विनंती केली आहे.
शहरात सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाकडून बेकायदा बॅनर, फ्लेक्स लावण्यात येतात. ज्यांनी नियमाची अंमलबजावणी करायची, त्या सत्ताधारी खासदार, आमदार यांच्या पदाधिकाऱ्यांकडून, विरोधी पक्षाचे नेते, पालिकेतील माजी सभापती, नगरसेवक यांचेही बॅनर लागतात. उच्च न्यायालयाने राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकरिता होर्डिंग्ज, फ्लेक्स, बॅनर्स, किऑक्स, गॅट्रीबाबत मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. या सूचनांचे स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्व राजकीय पक्षांनी तंतोतंत अंमलबजावणी करावी, याबाबत उच्च न्यायालयामध्ये राजकीय पक्षांकडून शपथपत्र दाखल करून घेतले आहे.
तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोशी येथील कार्यक्रमात अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स, बॅनर्स, किऑक्सवर माझे स्वतःचे फोटो किंवा जाहिरात असणारे होर्डिग्जविरूध्द प्रथम करवाई करावी, जेणेकरून इतरांमध्ये त्याचा सकारात्मक संदेश जाईल, अशा सूचना केल्या होत्या.
गल्लोगल्ली पोस्टर बॉईज
पिंपरी-चिंचवड शहरात फ्लेक्स, बॅनर, फलक लावण्यास बंदी आहे. तरीही वाढदिवसाच्या निमित्ताने बेकायदेशीर फलक लावण्याचे प्रकार वाढले आहेत. चमकोगिरी करणारे पोस्टर बॉइज दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिका प्रशासनही हैराण झाले आहे. कोणत्याही सोम्यागोम्याचा वाढदिवस पोस्टर लागल्याशिवाय साजरा होत नाही, अशी स्थिती आहे. किंबहुना वाढदिवस आणि फलकबाजी हे समीकरणच बनले आहे. सगळे नियम आणि कायदे धाब्यावर बसवून फुकटची चमकोगिरी करण्याचे प्रकार वाढले आहेत.
महापालिका, पोलिसांची डोकेदुखी वाढली
पोस्टर बॉईजची चमकोगिरी पालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे. अनधिकृत फलकांची संख्या वाढत असून अतिक्रमण काढताना वादाचे प्रसंग उद्भवतात. पोलिसांच्या दृष्टीनेही अनधिकृत फलकबाजी वाढत्या गुन्ह्यांना कारणीभूत ठरत आहे. एकमेकांचे फलक फाडणे, विटंबना करणे यातून मारामारी होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवत असल्याने पोस्टर्स बॉईज हेच नवी समस्या बनत आहेत.
आपले शहर प्रगतीशील आणि उच्चशिक्षित आहे. ते अधिक सुंदर आणि स्वच्छ बनविणे ही सर्व लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. लोकप्रतिनिधींचे सहकार्य नेहमीच मिळत आले आहे. शहराचे अनधिकृत होर्डिंग्ज, पोस्टर्स, बॅनर्स, डिझाईन्समुळे होणारे विद्रुपीकरण थांबवून अधिकृत होर्डिंग्जचा वापर करून शहराच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महापालिका




