
वादळी वारे, अवकाळी पावसामुळे जाहीरात होर्डिंग कोसळून दुर्घटना घडू नये म्हणून १५ एप्रिल ते १५ जून या दोन महिन्यांच्या कालावधीत जाहीरात बॅनर्स लावू नका, असे आदेश देऊनही शहरातील बहुतेकी होर्डिंगवर जाहिराती दिसून येत आहेत. त्यामुळे होर्डिंगधारकांनी महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या आदेशाला धाब्यावर बसवल्याचे दिसून येत आहे.
शहरात सद्यस्थितीमध्ये सुमारे एक हजार ४०० होर्डिंग अधिकृत असल्याचा दावा आकाशचिन्ह विभागाने केला आहे. होर्डिंगबाबत आकाशचिन्ह विभागाने नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत सूचना केल्यानंतरही होर्डिंगधारकांकडून मात्र नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे दिसून येत आहे. या वर्षीही १२ एप्रिल रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शहरात विविध ठिकाणी अनेक झाडे कोसळली. यामुळे होर्डिंग कोसळण्याचा धोका वाढला आहे. आकाश चिन्ह आणि परवाना विभागाने होर्डिंगधारकांची नुकतीच महापालिकेमध्ये बैठक घेतली होती.
त्यानंतर महापालिकेच्या वतीने १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत कोणतेही जाहीरात, बॅनर लावू नये, असे आदेश होर्डिंगधारकांना देण्यात आले होते.’आम्ही सर्व सूचनांचे पालन करू’ असे आश्वासन बैठकीमध्ये होर्डिंगधारकांनी प्रशासनाला दिले होते. मात्र त्यानंतरही शहरात ठिकठिकाणी होर्डिंगवर जाहिराती लावल्याचे दिसून येत आहे. परिणामी, महापालिकेच्या आदेशाला सर्रासपणे हरताळ फासला जात आहे.
पावसाळ्यापूर्वीच्या वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत होर्डिंगवर बॅनर लावू नयेत. होर्डिंग्ज रिकामे ठेवावे. त्याचे लोखंडी स्ट्रक्चर सुस्थितीत आहे का नाही याची तपासणी करावी, आदी सूचना संबंधितांना दिल्या होत्या. मात्र काही ठिकाणी होर्डिंगवर जाहिराती लावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधितांना पुन्हा एकदा सूचित केले जाईल आणि त्यानंतरही सूचनांचे पालन न झाल्यास होर्डिंग धारकांवर कारवाई करण्यात येईल.
- डॉ. प्रदीप ठेंगळे, उपायुक्त, आकाशचिन्ह आणि परवाना विभाग




