नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाया सुरू केल्या आहेत. तसंच दहशतवाद्यांना पोसणाऱया पाकिस्तानलाही भारतानं चांगलाच धडा शिकवला आहे. भारतातील पाकिस्तानी नागरिकांना हाकलून देण्यापासून ते थेट सिंधू जल करारापर्यंत असे अनेक निर्णय घेत भारतानं पाकिस्तानला धडा शिकवला. तरीही पाकिस्तान सुधारण्याचं नाव घेत नाही. अशातच आता भारत सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानी चॅनेल्सवर बंदी : पाकिस्तानी काही न्यूज चॅनेल्स तसंच युट्यूब चॅनेल्सवर भारतानं बंदी घातली आहे. गृह मंत्रालयाच्या शिफारशींनुसार, भारत सरकारनं डॉन न्यूज, समा टीव्ही, आर्य न्यूज, जिओ न्यूजसह 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे. सांप्रदायिकदृष्ट्या प्रक्षोभक, खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दाखवणे, भारतीय सैन्य आणि सुरक्षा एजन्सीविरूद्ध चुकीची माहिती प्रसारित करणे आदी कारणांमुळं ही बंदी घातली आहे.
माजी क्रिकेटर्सच्या युट्यूब चॅनेलवर बंदी : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात सतत कठोर निर्णय घेतले जात आहेत. भारत सरकारनं पाकिस्तानच्या अनेक युट्यूब चॅनेल्सवर बंदी आणली आहे. या चॅनल्समध्ये माजी क्रिकेटर शोएब अख्तर आणि आरजू काझमी यांसारख्या मोठमोठ्या युट्यूब चॅनल्सचाही समावेश आहे. त्याचसोबत प्रमुख मीडिया हाऊसच्या युट्यूब चॅनल्सवरही भारतात बंदी घातली आहे.
देशभरात संतापाची लाट : पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 26 पर्यटक मारले गेले. एप्रिल आणि मे महिन्यात काश्मीरमध्ये असंख्य पर्यटक फिरायला जातात. याच गोष्टीचा फायदा घेत दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. या घटनेवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळंच आता भारत सरकार पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोठमोठे निर्णय घेत आहे.