मुंबई: लातूरमध्ये अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना एखाद्या सराईत गुंडाप्रमाणे बेदम मारहाण करणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची अखेर त्यांच्या पदावरुन उचलबांगडी झाली आहे. राज्यातील मराठा समाजात मोठा जनाधार असलेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद उमटले होते. छावा संघटनेसह इतर मराठा संघटनाही या घटनेमुळे आक्रमक झाल्या होत्या. या सगळ्याची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी गंभीर दखल घेतली होती. या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांच्या दौऱ्यातून सूरज चव्हाण यांना वगळण्यात आले होते. तसेच अजित पवार यांनी सोमवारी सूरज चव्हाण यांना तातडीने मुंबईला भेटण्यासाठी बोलावले होते. मात्र, सूरज चव्हाण यांनी कालच्या मारहाणीत बोट फ्रॅक्टर झाल्याचे कारण पुढे केले होते. त्यामुळे आपण उपचारासाठी लातूरमध्येच थांबणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. यामागे अजितदादांची भेट टाळून कारवाई लांबवण्याचा सूरच चव्हाणांचा प्रयत्न होता का, अशा प्रश्नही उपस्थित झाला होता. मात्र, अजित पवार यांनी मराठा संघटनांचा रोष वाढत चालल्याने सूरज चव्हाण भेटायला येण्याचीही वाट न पाहता थेट ट्विटरवरुनच त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे आता सूरज चव्हाण यांना कोणत्याही परिस्थितीत आपल्या पदाचा राजीनामा देणे भाग आहे.
काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे, असे अजित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अजित पवारांनी आज दुपारी 12.11 वाजता ट्विट करुन लातूरमधील घटनेचा कडक शब्दात निषेध केला. लातूरमध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो, असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यानंतर सूरज चव्हाण सद्सदविवेकबुद्धीला स्मरुन स्वत:हून आपल्या पदाचा राजीनामा देतील किंवा तशी घोषणा करतील, अशी अपेक्षा होती. परंतु, अजितदादांच्या ट्विटनंतरही सूरज चव्हाण यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्याची किंवा राजीनामा देण्याची तसदी घेतली नाही. परिणामी अजित पवार यांनी 12.59 वाजता लगेच दुसरे ट्विट करत सूरज चव्हाण यांना जाहीरपणे तातडीने पदाचा राजीनामा देण्याची सूचना केली. हे ट्विट आल्यानंतर सूरज चव्हाण यांना नाईलाजाने का होईना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.