सातारा – लोकांची कामे करण्यासाठी सत्तेत गेलं पाहिजे, अशी ठराविक आमदारांकडून चर्चा झाली असावी. त्यानुषंगानं शरद पवार साहेब मुलाखतीत बोलले असतील. पक्षप्रमुख म्हणून त्यांनी प्रश्न विचारला तर मी माझं मत त्याठिकाणी मांडेन, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवारांनी दिली, तर ‘मला यातील काहीच माहिती नाही’, असं सांगत आपण अनभिज्ञ असल्याचं खा. सुप्रिया सुळेंनी दाखवलं.
शरद पवार गटातील नेत्यांची सत्तेविना तडफड : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांना पराभवाचा झटका बसला. राज्यात महायुतीची सत्ता आली. पवारांच्या पक्षातील नेत्यांना मतदार संघातील विकासाची आणि सर्वसामान्यांची कामे होण्यासाठी सत्तेत नसल्याची उणीव जाणवू लागली आहे. एका अर्थाने सत्तेविना त्यांची तडफड सुरू आहे.
काही आमदार अजितदादांसोबत जाण्याच्या तयारीत : विकासकामे होण्यासाठी सत्तेत गेलं पाहिजे, अशी इच्छा काही आमदारानी शरद पवारांकडे बोलून दाखवल्याचं समजतंय. तोच धागा पकडून शरद पवारांनीही मुलाखतीत भाष्य केलं होतं. याबद्दल खा. सुप्रिया सुळे यांना विचारलं असता, जर शरद पवार साहेब याबद्दल बोलले असतील, तर मी काय बोलणार? असे म्हणत त्यांनी प्रश्नाला बगल दिली. मात्र, आमदार रोहित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना ‘ठराविक आमदारांनी तशी चर्चा केली असेल’, असं सांगितलं.
चर्चेमुळं दोन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी ताकद मिळाली : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार, अशी चर्चा मीडिया आणि सोशल मीडियात झाली. त्यामुळं त्याला ताकद मिळाली आहे. यासंदर्भात शरद पवारांनी जर बैठक बोलावली तर मी त्याबद्दलचं मत मांडेन, असं आमदार रोहित पवारांनी सांगितलं.
नव्या पिढीकडे जबाबदारी देणार? : पुढच्या पिढीला जबाबदाऱ्या देणार आहोत. सुप्रिया सुळे आणि बाकीचे नेते एकत्रिकरणाचा निर्णय घेतील, असं वक्तव्य शरद पवारांनी मुलाखतीत केलं होतं. हे समजून घेतलं पाहिजे, असं सूचक वक्तव्य करत आमदार रोहित पवारांनी भविष्यातील राजकीय घडामोडींचे स्पष्ट संकेत दिले.