
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवार (दि.26) पासून दोन दिवस दौऱ्यावर आले होते. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा मार्ग मोकळा केल्याने तसेच आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र राज ठाकरे यांनी नाशिक दौरा अवघ्या तीन तासातच उरकून ते आता मुंबईकडे रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सोमवारी सकाळी 11.15 वाजेच्या सुमारास राज ठाकरे यांचे हॉटेल एसएसके येथे आगमन झाले. त्यानंतर त्यांनी शहरातील स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. येत्या काही महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याने त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. तर ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांशी देखील त्यांनी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.
यानंतर राज ठाकरे हे अचानक मुंबईकडे रवाना झाले. नाशिकहून राज ठाकरे यांचा पुणे जिल्ह्याचा नियोजित दौरा होता. मात्र राज ठाकरे यांनी पुणे जिल्ह्याचा दौरा रद्द करत ते अचानक मुंबईकडे रवाना झाले. राज ठाकरे यांनी दोन दिवसीय नाशिक दौरा अवघ्या तीन तासातच उरकल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर राज ठाकरे हे काही खासगी कारणासाठी मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.
ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत नाशिकच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा नाही
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वबळावर लढणार की एकत्रित निवडणूक लढणार यावरून चर्चा रंगली आहे. त्यातच आता गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना आणि मनसेच्या संभाव्य युतीबाबत राज ठाकरे हे नाशिकमधील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या विषयावर नाशिकमधील पदाधिकाऱ्यांशी कुठलीही चर्चा झाली नसल्याची माहिती मनसे नेते दिनकर पाटील यांनी दिली आहे.