पिंपरी (प्रतिनिधी) : शहरात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा आणि दुर्लक्षाचा फटका पुन्हा एकदा समोर आला आहे. बेंगलोर-मुंबई महामार्गावर तब्बल तीन फूट पाणी साचल्याने वाहनचालकांची मोठी वाहतूक कोंडी झाली. विशेषतः ताथवडे आणि पुनावळे परिसरातून वाहणारे पावसाचे पाणी थेट महामार्गावर आल्यामुळे रस्ते जलमय झाले होते.
पश्चिमेकडील ताथवडे व पुनावळे परिसर वेगाने विकसित होत असूनही, त्या भागात महापालिकेकडून योग्य पद्धतीने ड्रेनेज व स्ट्रॉम वॉटर लाईनचे नियोजन झालेले नाही. या परिसरातील नैसर्गिक नाले आणि ओढ्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून, महापालिकेने या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. परिणामी, पावसाचे पाणी वाहून जाण्याच्या मार्गांवर अडथळे निर्माण झाले असून, ते थेट रस्त्यावर पाणी साचत आहे.
पुनावळे, माळवाडी परिसरातील वाढत्या रहिवासी सोसायट्यांचे सांडपाणी ड्रेनेज व्यवस्थापन अत्यंत अपुरे असून, कधी ते नाल्यातून तर कधी उघड्यावरून वाहत रावेत येथील एसटीपीपर्यंत पोहोचते. यामध्ये नैसर्गिक नाले बुजवले गेले असल्याने पावसात पाणी तुंबण्याचे प्रमाण अधिकच वाढले आहे.
सोमवारी पावसामुळे इंदिरा कॉलेज समोर मुंबई-बेंगळुरू महामार्गावर पावसाचे साचलेले पाणी वाहतुकीस अडथळा ठरत होते. त्यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या, व नागरिकांना दीर्घ वेळ वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. अनेक ठिकाणी भुयारी गटारे तुंबल्यामुळे रस्त्यावर राडारोडा वाहू आला आणि नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागली.
तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे पुनावळे आणि ताथवडे येथील अंडरपासदेखील पाण्याने भरल्यामुळे वाहने चालवताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. या संपूर्ण परिस्थितीमुळे महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नागरिक आणि वाहनचालकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.




