हिंजवडी, पिंपरी-चिंचवड – शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असतानाच, आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात वाकड-हिंजवडी मुख्य रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
मुख्य रस्त्यावरून पाण्याचा योग्य निचरा न झाल्यामुळे सखल भागात दोन फुटांपेक्षा अधिक पाणी साचले आहे. परिणामी, वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली असून वाहनचालकांना मोठ्या कसरतीनंतर आपली वाहने पुढे सरकवावी लागत आहेत. काही दुचाकी व चारचाकी वाहने तर पाण्यात बंद पडली, ज्यामुळे वाहनधारकांना वाहने ढकलत नेण्याची वेळ आली.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. “रोजच्या प्रवासातच अडचण येतेय, पाणी साचतं आणि वाहतूक काही वेळात ठप्प होते,” असे एका आयटी कर्मचाऱ्याने सांगितले.
मेट्रोच्या कामामुळे आधीच रस्त्यांची खोदकामं सुरू असताना या पावसामुळे परिस्थिती अधिक बिकट झाल्याचे दिसून येते. प्रशासनाने लवकरात लवकर निचऱ्याची व्यवस्था केली नाही, तर येत्या काळात आणखी गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात, असा इशारा नागरिकांकडून दिला जात आहे.