
नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दिल्लीतील सीआरपीएफ जवान मोतीराम जाट याला अटक करण्यात आली आहे. त्याने पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती पुरवल्याची माहिती मिळाली आहे. २०२३ पासून ही माहिती पुरवली जात होती. त्याबदल्यात त्याला पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांकडून पैसे मिळत होते. दरम्यान, त्याला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले असून पटियाला हाऊस कोर्टाने आरोपीला ६ जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे.
आरोपी गेल्या २ वर्षांपासून हेरगिरी करत होता. त्याने देशाची महत्त्वाची आणि गोपनीय माहिती पाकिस्तानच्या अनेक अधिकाऱ्यांसोबत शेअर केली आहे. त्याला पाकिस्तानातून अनेक वेगवेगळ्या पद्धतींनी पैसे पाठवण्यात आले आहेत. हा व्यवहार बहुतेक हवालाद्वारे केला जात होता. तपास संस्थांच्या मते, जवान आधीच आयएसआयच्या निशाण्यावर होता. यामुळेच त्याला पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या चौकशीत अडकवण्यात आले आणि अनेक गुप्त माहिती हस्तगत करण्यात आली. ही माहिती देशासाठी धोका निर्माण करू शकते. सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की, तो २०२३ पासून हे देशद्रोहाचे कृत्य करत होता, अशी माहिती एनआयएने दिली आहे.
या संपूर्ण प्रकरणात आणखी लोकांचा सहभाग असू शकतो. चौकशीनंतर आणखी अनेक गुपिते उघड होतील. एजन्सी मोतीराम जाटच्या संपर्कात असलेल्या किंवा ज्यांच्या माध्यमातून ही माहिती लीक होत होती त्यांच्यावरही लक्ष ठेवून असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या जवानाच्या बँक खात्यांची चौकशी केली जात आहे. यासोबतच त्याच्या कुटुंबातील इतर लोकांची बँक खाती देखील शोधली जात आहेत. पथकाला संशय आहे की, पाकिस्तानकडून मिळत असलेले पैसे जवानाच्या कुटुंबाच्या खात्यात जमा होत होते. दरम्यान एनआयएची ही कारवाई संभाव्य धोका रोखण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
सेवेतून बडतर्फ
दरम्यान, सीआरपीएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्रीय तपास यंत्रणांशी समन्वय साधून मोतीराम जाटच्या सोशल मीडियावरील हालचालींवर लक्ष ठेवत असताना त्याने स्थापित नियम आणि प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. आता पुढील चौकशीसाठी त्याला एनआयएकडे सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर सीआरपीएफ नियमांच्या भारतीय संविधानाच्या संबंधित तरतुदींनुसार २१ मे पासून त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले.
