पुणे ; पंढरपूरकडे पायी वारी करणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेल्या शौचालय व स्वच्छता सुविधांची उभारणी यंदा एका नव्या, महाराष्ट्राबाहेरील कंपनीकडे सोपविण्यात आला आहे. चार वेळा फेरनिविदा प्रक्रिया पार पडून अखेर दिल्लीस्थित ‘मे. भूतानि इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला आषाढी वारीसाठी शौचालय उभारणी व संबंधित सेवा पुरविण्याचा ठेका मिळाला आहे.
चार वेळा फेरनिविदा – अखेरचा मुहूर्त
देहू व आळंदी येथे निघणाऱ्या पालखी प्रस्थान सोहळा पाच दिवसावर येऊन ठेपला आहे. या सोहळ्यासाठी राबवण्यात येणाऱ्या नोव्हेंबर २०२४ पासून सुरु झालेल्या निविदा प्रक्रियेत अनेक अडथळे आले. पुणे जिल्हा परिषदेकडून चार वेळा, तर सोलापूर जिल्हा परिषदेकडून एकदा निविदा काढण्यात आली. अनेक वेळा ही प्रक्रिया रद्द झाली, यामागे ‘वारीचा अनुभव असलेली कंपनीच पात्र’ अशी अट होती. मात्र, ग्रामविकास मंत्रालयाच्या सूचनांनंतर ही अट शिथिल करण्यात आली आणि प्रक्रिया राबविली आणि महाराष्ट्र बाहेरील नवख्या ठेकेदाराला अखेर ही निविदा मिळाली.
१८ कोटींच्या कामाचे १३ कोटींमध्ये
पूर्वीच्या ठेकेदारांकडून मिळणाऱ्या अपेक्षित कोटेशनच्या तुलनेत भूतानि इंटरनॅशनलने सुमारे २५% कमी दर दिल्याने, सुमारे १८ कोटी रुपयांचे काम फक्त १३ कोटी रुपयांत करण्याचे आश्वासन देत त्यांनी हा ठेका मिळवला. यामध्ये तात्पुरती शौचालयं, मूत्रालयं, स्वच्छता व्यवस्था, आणि देखभाल व्यवस्थापन यांचा समावेश आहे.
राजकीय सहभाग आणि मानापमानाचे नाट्य
ही निविदा प्रक्रिया केवळ तांत्रिक नव्हती, तर राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची ठरली. मुख्यमंत्री, तसेच सोलापूर आणि पुण्याचे पालकमंत्री यांचाही या प्रक्रियेत सक्रिय सहभाग होता. निविदा प्रक्रियेतील अटी शर्ती बदलण्यावर अनेक जुने ठेकेदार नाराज व्यक्त केली. परंतु प्रशासनाने निर्णय पारदर्शक पद्धतीने घेतल्याचा दावा केला जात आहे.
भूतानि इंटरनॅशनल – नवखा ठेकेदार, मोठी जबाबदारी
या कंपनीला यापूर्वी आषाढी वारीसारख्या धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील व मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गर्दीच्या कार्यक्रमाचा अनुभव नाही. त्यामुळेच “वारीचा अनुभव” ही अट वगळण्यात अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. “भूतानि इंटरनॅशनल” ही कंपनी देहू-आळंदीपासून पंढरपूरपर्यंतच्या वारकऱ्यांना वेळेवर, दर्जेदार आणि स्वच्छ सेवा पुरवू शकेल का? अशी शंका वारकऱ्यांच्या मनात उपस्थित झाली आहे.
आतापर्यंतच्या त्रासाची पुनरावृत्ती होणार की नवा अनुभव?
गेल्या काही वर्षांत वारकऱ्यांना सार्वजनिक शौचालयांचा अभाव, अपुरी स्वच्छता, वेळेवर देखभाल न होणे, अशा समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यामुळेच नवीन ठेकेदाराकडूनही कार्यक्षम सेवा दिली नाही, तर प्रशासनावर टीका आणि दबाव वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
शौचालयांचे प्रमाण आणि वितरण
१) स्वच्छता कामगारांची संख्या व कार्यपद्धती
२) महिलांसाठी सुविधा
३) अंधार व पाणीपुरवठ्याची सोय
४) देखभाल व तक्रार निवारण यंत्रणा
यंदाची आषाढी वारी प्रशासनासाठी आणि नव्या ठेकेदार कंपनीसाठी कसोटीची ठरणार आहे. भूतानि इंटरनॅशनलने कमी दरात मोठे काम स्वीकारले आहे. पण आता खरे आव्हान हे कार्यक्षमता आणि जबाबदारीच्या सिद्धतेचे आहे. वारकऱ्यांचे अनुभव आणि सेवा दर्जाच यावर्षीच्या ठराविक यशाचे प्रमाण ठरेल.




