अहमदाबाद : सध्या सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अहमादाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं आहे. विमान कोसळल्यानंतर काही व्हिडीओ समोर आले आहेत. व्हिडीओमध्ये फक्त धुराचे लोट दिसत आहेत. धुराचे लोट पाहून विमानाला मोठा अपघात झाला असावा, असा अंदाज लावला जात आहे. अद्याप मात्र नेमकी जीवितहानी झाली का? याची माहिती मिळालेली नाही. हे बिमान टेक ऑफ करतानाच कोसळलं असल्याचं बोललं जातंय. या विमानत एकूण 242 प्रवासी होते, असं सांगितलं जातंय. हे विमान लंडनला जात होतं. मात्र त्याआधीच या विमानाचा अपघात झाला.
विमान कोसळलं, बचावकार्य सुरू
अहमदाबादमधील मेघानी इथं हे विमान कोसळलं आहे. विमान कोसळण्याचं नेमकं कारण काय आहे? हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही दुर्घटना झाली असावी, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. सध्या या परिसरात फक्त धुराचे लोट दिसत आहेत. त्यामुळे विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली असावी, असाही अंदाज लावला जात आहे.
विमान कोसळले; 242 प्रवासी होते
आज, १२ जून २०२५ रोजी, अहमदाबादमधील मेघानी नगर भागात एअर इंडियाचे लंडन-गॅटविककडे जाणारे विमान टेकऑफनंतर काही मिनिटांत कोसळले. या अपघातात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. विमानाचे मॉडेल बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर होते, ज्यामध्ये २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. यात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनेडियन नागरिकांचा समावेश होता.
विमानाच्या टेकऑफनंतर लगेचच मेघानी नगर परिसरात जोरदार स्फोटांच्या आवाजाने आणि धुराच्या लोटांनी परिसर दाटून गेला. अद्याप अधिकृत मृत्यूसंख्या जाहीर झालेली नाही, परंतु बचावकार्य सुरू आहे. राहिलेल्या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि स्थानिक आपत्कालीन सेवांनी मदत कार्य सुरू केले आहे.