सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते सत्यजित पाटणकर यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. ‘विकसित भारत’ घडविण्याचे क्षमता व सामर्थ्य केवळ भारतीय जनता पार्टीमध्येच आहे, ही बाब राज्याच्या कानाकोपऱ्यातील राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पटवून देण्यात यश येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) गटाचे नेते आणि त्यांचे सहकारी यांनी भाजपात प्रवेश केला त्यांचे स्वागत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात केले.
पाटणकर यांच्यासह कोयना शिक्षण संस्थेचे संचालक याज्ञसेन पाटणकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हिंदुराव पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश पवार, पाटण पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ शेलार, पाटण नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सचिन कुंभार, पाटण अर्बन बँकेचे माजी चेअरमन दिनकरराव घाडगे, पाटण तालुका दूध संघाचे चेअरमन सुभाषराव पवार, युवानेते अभिजीत पाटील, राजे संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पाटणकर, माजी उपसभापती रमेश मोरे, पाटण अर्बन बँकेचे व्हा. चेअरमन रविंद्र ताटे, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन बाळासाहेब राजेंमहाडिक, पाटण तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अविनाश जानुगडे, खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन हणमंतराव खबाले पाटील, माजी उपसभापती प्रताप देसाई, शंकरराव शेडगे, समीर कदम, साहेबराव गायकवाड, निवास शिंदे, अमर पवार आदी पदाधिकाऱ्यांनी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी आज भाजपा परिवाराचे कमळ हाती घेतले.
भाजपा प्रदेश मुख्यालयात संपन्न झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्याला उपस्थित राहून पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत केले. या प्रसंगी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खा. उदयनराजे भोसले, भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष आ. अतुल भोसले, भरत पाटील, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.



