लोणावळा: मुंबई आणि पुणे जिल्ह्यातील पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा लोणावळ्यातील भुशी डॅम अखेर पावसामुळे पूर्णपणे भरला आहे. मात्र, मागील वर्षी मावळ तालुक्यात अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव भुशी डॅम सह मावळ तालुक्यातील अनेक पर्यटन स्थळावरती पर्यटकांना प्रवेशास बंदी घातली आहे.
दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक पावसाळी सहलीसाठी भुशी डॅम परिसरात गर्दी करतात. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या दुर्घटनेत चार ते पाच पर्यटकांना जलप्रवाहात अडकून आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर प्रशासन अधिक सतर्क झाले असून, यंदा संभाव्य धोका लक्षात घेता भुशी डॅम परिसर आणि वर्षाविहारासाठी मावळ तालुक्यातील अनेक ठिकाणी पर्यटकांची वर्दळ टाळण्यासाठी प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, स्वतःच्या सुरक्षिततेसाठी बंदी असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. लोणावळ्यातील इतर सुरक्षित पर्यटनस्थळांना भेट देताना आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
पावसाळ्यात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी प्रशासनाच्या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे असून, नियम व सुरक्षिततेचा आदर राखूनच पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन स्थानिक अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.