मुंबई : ”राज्यातील विद्यार्थी पाठीमागे राहू नये, यासाठी त्रिभाषा सूत्र राबविले जात आहे. दैनंदिन जीवनात हिंदी भाषेचा जास्त वापर होतो. त्यामुळे पालकांच्या मागणीनुसार, हिंदी विषय शिकवला जाणार आहे. काल पहिली ते चौथीसाठी जो शासन आला आहे, त्यात कुठेही अनिवार्य शब्द नाही. त्यामुळे हिंदी विषय घ्यायचा का नाही, हे विद्यार्थी ठरवतील,” असे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले. ते माध्यमांशी बोलत होते.
दादा भुसे म्हणाले की, सर्व भाषांमध्ये मराठी भाषा बंधनकारक असणार आहे. इयत्ता पाचवीपासून हिंदी विषय आहे. तो बऱ्याच वर्षांपासून शिकविला जात आहे. इतर माध्यमांच्या शाळेत त्यांची भाषा, मराठी भाषा, इंग्रजी तिसरी भाषा असणार आहे. तसेच, शिक्षक संख्या कमी केली जाणार नाही. आता शिक्षक भरतीची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.
दरम्यान, सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा बंधनकारक असणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार तिसरी भाषा शिकवली जाणार आहे. ते नियोजन करताना त्या वर्गातील किमान २० विद्यार्थ्यांनी मागणी केली तर शिक्षक उपलब्ध करून दिले जातील, असेही ते म्हणाले.