
पिंपरी-चिंचवड | श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आळंदीहून शुक्रवारी (दिनांक २०) पहाटे पुण्याकडे मार्गस्थ झाला आहे. या पालखी सोहळ्यामध्ये लाखो वारकरी आणि भाविक सहभागी झाले आहेत.
आळंदी ते पुणे दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून ‘ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम’ च्या नामघोषात पालखी मार्गस्थ होत असताना भक्तांकडून पालखीचे जागोजागी जोरदार स्वागत करण्यात येत आहे. वारकऱ्यांच्या सेवेत भक्तगण त्यांना पावसापासून वाचण्यासाठी रेनकोट, छत्री, टोप्यांचे वाटप करीत आहेत.
जागोजागी वारीतील वारकऱ्याना, भाविक भक्ता यांना फराळाचे वाटप करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने केळी, राजिगारा लाडू, शेंगदाणा लाडू इत्यादींचे वाटप करण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याच्या बॉटल त्यांना मोफत वाटण्यात येत आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये दिघी पर्यंत त्यांना इतर कोणत्याच अडचणी निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. अनेक सेवाभावी संस्थांनी वारकऱ्यांचे हेल्थ चेकअप कॅम्प लावले आहेत. तसेच सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त ही चोख ठेवण्यात आला आहे.