माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर बारामतीत राजकारण चांगलेच तापलं आहे. ‘सहकार बचाव पॅनल’ने पीडीसीसी बँकेवर गंभीर आरोप केले असून, रात्री 11 वाजेपर्यंत ही बँक उघडी ठेवण्यात आली होती, असा दावा करत तेथे मतदार यादी आढळल्याचा खुलासा केला आहे. रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार बचाव पॅनल’चे कार्यकर्ते बँकेत पोहोचले आणि त्यांनी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पैशांचा वापर केला जात असल्याचा दावा केला आहे. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए सुनील मुसळे बँकेत उपस्थित होते, तसेच मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकारीही तिथे होते, असा दावा तावरे यांनी केला. यामुळे आता बारामतीतील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
सूचना असल्याशिवाय कर्मचारी बॅंक कशाला उघडेल? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित करत लोकसभा निवडणुक झाली त्यावेळी बँक उघडलेली होती. आज या बॅंकेमध्ये हे दुसऱ्यांदा घडत आहे. बॅंक कशी उघडी होती. बॅंकेचे नेतृत्व करणारे लोक आहेत, त्यांच्या काही सूचना असल्याशिवाय तो कर्मचारी ती बॅंक कशाला उघडेल. एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्या बँकेमध्ये आपल्याला दुसऱ्यांदा दिसते आहे. याचा अर्थ काय समजायचा तो समजा असंही पुढे शरद पवार म्हणाले आहेत.
या आरोपांवर पीडीसीसी बँकेचे असिस्टंट मॅनेजर जगदाळे यांनीदेखील या प्रकरणा स्पष्टीकरण दिलं आहे. “बँक साडेपाच वाजता बंद होते. नंतर फोन आल्यामुळे मी पुन्हा बँकेत आलो. संगणकीय काम सुरू असल्यामुळे काही कर्मचारी उशिरा थांबले होते. मात्र, माळेगाव कारखान्याच्या मतदार याद्या बँकेत कशा आल्या हे मला माहीत नाही.” असं जगदाळे यांनी म्हटलं आहे.
या घटनेतवर युगेंद्र पवार यांनीदेखील संताप व्यक्त केला आहे. बँकेची वेळ ही पाच वाजेपर्यंत असते इतक्या वेळ ही बँक उघडी होती. त्या ठिकाणी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदारांच्या याद्या होत्या, त्या का होत्या. सहकारी संस्था शिक्षण संस्था याच्या देखील याद्या त्या ठिकाणी होत्या. बँकेचा लोड वाढला असावा त्यामुळे रात्री 11 पर्यंत हे बँक उघडी असावी अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवार यांनी दिलेली आहे. अलीकडच्या काळात पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय, त्यामुळे सर्वसामान्य सभासदांना अवघड झालं आहे. त्याचप्रमाणे हे राजकारण बदललं पाहिजे असे मत युगेंद्र पवारांनी व्यक्त केले.