पिंपळे सौदागर : जागतिक योग दिनाच्या निमित्ताने नाना काटे सोशल फाउंडेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आज पिंपळे सौदागर येथील पी.सी.एम.सी. ग्राउंडवर भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ प्रतिनिधी श्री. हसनजी तफ्ती, प्रशिक्षक शशांक खांडेकर आणि निशा लुल्ला यांनी योग मार्गदर्शन केले.
या शिबिरात नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योगासने केली. योगाभ्यासात सहभागी होत योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना वक्त्यांनी सांगितले की,
“योग हा केवळ व्यायाम नाही, तर तो अंतर्मनाच्या शांतीचा मार्ग, सुदृढ शरीराचा आधार आणि सकारात्मक जीवनशैलीचा मूलमंत्र आहे. योगासने आपल्याला श्वासावर लक्ष केंद्रित करायला शिकवतात व जीवनाचा समतोल राखायला मदत करतात. योगदिनाच्या निमित्ताने शिबिरात उपस्थित नागरिक, विद्यार्थी, युवा वर्ग यांनी शरीर, मन आणि आत्म्याच्या संतुलनाचा अनुभव घेतला.
या कार्यक्रमाला युवानेते उमेश काटे, पै काळुराम कवितके, सुमित डोळस, सतीश डोंगरे, सचिन देसाई यांच्यासह परिसरातील नागरिक, आर्ट ऑफ लिव्हिंगचे सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे आयोजन अतिशय उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. उपस्थितांनी योग दिनाचे महत्त्व अधोरेखित करत नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प केला.