महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आज विधानसभेत सत्ताधारी व विरोधक आमने-सामने आले. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर आक्रमकपणे विरोधकांनी भूमिका मांडली. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांचं एक दिवसासाठी निलंबनदेखील करण्यात आलं. पण यानंतर चक्क सत्ताधारी बाकांवरून भाजपाच्या आमदारांकडूनच वरीष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांबाबत तक्रार करण्यात आल्याची बाब विधानसभेत घडली. माजी मंत्री व भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात तालिका अध्यक्षांकडे तक्रार केल्यानंतर तालिका अध्यक्षांनी त्यावर शासनाला निर्देश दिले.

नेमकं काय घडलं?

मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास विधानसभेत महाराष्ट्र विधिमंडळ नियम २९३ नुसार महत्त्वाच्या सार्वजनिक मुद्द्यांवर चर्चेचा प्रस्ताव मांडण्यात आला. सभागृहातील जवळपास ५० सदस्यांनी हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावरील चर्चेला सुरुवात होण्याआधीच माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वरीष्ठ सनदी अधिकाऱ्यांबाबतचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला.