
मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात मिळालेल्या यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी शनिवारी एकत्र आले होते. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात मनसे व शिवसेना ठाकरे गटाचे एकजुटीचे दर्शन घडले. महाराष्ट्राच्या राजकीय व सांस्कृतिक इतिहासातील हा एक महत्त्वाचा क्षण असल्याचे मानले जात आहे. मेळाव्याच्या यशानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी “सिंहासन खाली करो, ठाकरे आए हैं!” अशी घोषणा करत सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला. आता संजय राऊत यांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी खोचक टोला लगावला आहे.
मंत्री गुलाबराव पाटील जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी असे वक्तव्य केले. याबाबत विचारले असता गुलाबराव पाटील म्हणाले की, ठीके, चांगली गोष्ट आहे. कोणतेही पक्ष एकत्र होतात, शेवटी त्यांचा हा व्यक्तिगत विषय आहे. त्यात आपण बोलणे उचित नाही, असे त्यांनी म्हटले.
संजय राऊत यांनी सिंहासन खाली करा, ठाकरे येत आहेत, असे म्हटले होते. याबाबत विचारले असता संजय राऊत खाली बसलेले होते, जास्त बोलायचं काम नाही, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे. तर जे बाळासाहेब ठाकरे यांना जमले नाही, ते देवेंद्र फडणवीस यांना जमले, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. याबाबत विचारले असता राज साहेब हे बोलण्यात कसे आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पण शेवटी आता हे चालणारच आहे, असे प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली.
ठाकरेंनी या विषयाचा बाऊ केला
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, आपण त्यांच्यावर बोलण्यात काहीही अर्थ नाही. आपण फक्त आपल्या पक्षाचे काम करणं, महायुतीच्या सरकारचं काम अजून आणखी गतीने वाढवले पाहिजे. समोरच्याकडे काय अजेंडा आहे? हे आपल्याला माहिती आहे. मराठी आपण पण आहोत, आणि ते देखील मराठी आहेत. फक्त विषय असा आहे की,पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी विषय सक्ती करू नये. पाचवीपासून सगळे हिंदी बोलतात, मी देखील पाचवीनंतर हिंदी शिकलो आहे. विषय इतकाच आहे की, त्यांनी या विषयाचा बाऊ केला म्हणून आपण करावे, असे आम्हाला वाटत नाही. कोणावर बोलण्यापेक्षा आपलं काम जोरात चाललं आहे.
तुम्ही बोलत राहा, आम्ही ऐकत राहू
मराठीसाठी गुंडगिरी करायला देखील आम्ही तयार आहोत, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. याबाबत विचारले असता गुलाबराव पाटील म्हणाले की, कोण गुंडगिरी करणार नाही? गुंडगिरी सगळे करतात. पण गुंडगिरी करण्यासारखे वातावरण तर पाहिजे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचा गद्दार म्हणून उल्लेख केला. याबाबत विचारले असता ते आता आम्हाला ऐकायची सवय होऊन गेली. तुम्ही बोलत राहा, आम्ही ऐकत राहू, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली.



