मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या राज्य परिषद सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत राज्यातील एकूण ६६ सदस्यांची घोषणा करण्यात आली. यामध्ये पिंपरी चिंचवड शहर व मावळ तालुक्यातील पाच मान्यवरांचा समावेश करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातून विधान परिषदेचे आमदार उमा खापरे, भाजप शहराध्यक्ष अमित गोरखे आणि युवा नेतृत्व अनुप मोरे यांची निवड करण्यात आली आहे. तर मावळ तालुक्यातून माजी आमदार बाळा भेगडे व समाजसेवक गणेश भेगडे यांना राज्य परिषद सदस्यपदी स्थान मिळाले आहे.
या निवडीमुळे पिंपरी चिंचवड व मावळ भागातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, स्थानिक नेतृत्वाला दिलेले हे प्रतिनिधित्व आगामी काळात पक्षबळ वाढविण्यात उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
राज्यस्तरावर घेतलेल्या या निर्णयामागे पक्षाची संघटनात्मक बळकटी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेतृत्वाला अधिक जबाबदाऱ्या देण्याचा प्रयत्न असल्याचे भाजप सूत्रांकडून सांगण्यात आले.