पुणे : ती अवघ्या 16 वर्षांची… रागात घर सोडलेली एक अल्पवयीन मुलगी पुण्यातील बुधवार पेठेतील ‘रेड लाईट’ परिसरात एकटीच भर रस्त्यात फिरताना पोलिसांच्या नजरेस पडली… थोडा जरी उशीर झाला असता, तर तिचे संपूर्ण आयुष्य अंधाराच्या दरीत लोटले असते… पण, पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे ती मुलगी सुखरूपपणे आपल्या आई-वडिलांच्या कुशीत परतली. ही केवळ एक कारवाई नव्हे, तर घरातून रागाच्या भरात बाहेर पडणार्या अनेक मुलांसाठी डोळे उघडणारा धडा ठरला आहे.
दि. 8 जुलै रोजी फरासखाना पोलिस ठाण्याचे पोलिस पेट्रोलिंग करीत असताना बुधवार पेठेतील दत्त मंदिराजवळ एक संशयास्पद अल्पवयीन मुलगी फिरताना आढळली. पोलिस मित्रांनी ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक अरविंद शिंदे आणि अंमलदार गजानन सोनुने, रेखा राऊत, सारिका गुंजाळ, अनिता साबळे यांनी तिला ताब्यात घेतले.
चौकशीत समोर आले की, ही मुलगी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील असून, घरात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाच्या रागातून ती पुण्यात आली होती. मात्र, हिंगोलीत तिच्या अपहरणाची तक्रार दाखल झाली होती. याबाबत त्वरित हिंगोली पोलिसांशी संपर्क साधून त्यांना मुलगी सुखरूप असल्याची माहिती दिली गेली. अखेर हिंगोलीच्या आखाडा पोलिसांच्या ताब्यात तिच्या आई-वडिलांसह तिला सुपूर्त करण्यात आले.