पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 128 शाळांची स्मार्ट शाळांकडे वाटचाल सुरू आहे. शाळांतून तंत्रज्ञानाचा वाढता वापर मुलांच्या अभ्यासात लाभदायी ठरत आहे. त्याचबरोबर या शाळांतील विद्यार्थ्यांना इंग्रजीतून संवाद साधता यावा, यासाठी 2022 मध्ये स्पोकन इंग्लिश उपक्रम सुरू करण्यात आला; मात्र सध्या हा उपक्रम बंद आहे. त्यामुळे स्पोकन इंग्लिशचा नुसताच दिखावा, केल्याचे दिसून येत आहे. शहरात सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य पालकही आपल्या पाल्यास इंग्रजी माध्यमांच्या शाळांत प्रवेश घेण्यास प्राधान्य देतात; मात्र या कारणामुळे पालिका शाळांतील पटसंख्या कमी होत आहे.
पालिकांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषण करता यावे, या हेतूने महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पालिका शाळांत स्पोकन इंग्लिश वर्ग सुरू करण्यात आले होते. महापालिकेच्या शाळांमध्ये 45 हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळत होता. खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना ज्या प्रकारचे शिक्षण दिले जाते. ज्या तंत्रज्ञान व माध्यमांचा वापर केला जातो. त्याप्रमाणे स्टेम लॅब, कॉम्प्युटर लॅब, इंग्लिश टिचिंग अशा डिजिटलायजेशनच्या दृष्टीने पूरक गोष्टींचा अंतर्भाव स्मार्ट शाळांमध्ये आहे.
पालिकेच्या प्रत्येक शाळांत तीन शिक्षक
स्मार्ट शाळांमध्ये स्मार्ट टीव्ही देण्यात आला आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना शिकविण्यात येते; तसेच विज्ञान, गणित व संगणक विषयांसाठी एकत्रित स्टेम लॅब बनविण्यात आली आहे. पालिकेच्या प्रत्येक शाळांमध्ये स्टेम लॅबसाठी एक शिक्षक, कॉम्प्युटर लॅबसाठी एक शिक्षक व इंग्लिश टिचिंगसाठी एक एक्सपर्ट असे तीन शिक्षक एक वर्षाच्या करारावर नेमण्यात आले होते. त्यांना वर्षभरामध्ये शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण द्यायचे होते. मात्र, वर्षभरानंतर हा उपक्रम काही दिवस चालला त्यानंतर आता हा उपक्रम बंद आहे. सद्यस्थितीमध्ये स्टेम लॅब, कॉम्प्युटर लॅबसाठी शिक्षक आहेत; परंतु स्पोकन इंग्लिशचे वर्ग बंद आहेत.