मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील कँटीन चालवणाऱ्या कंत्राटदाराचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) निलंबित केला आहे. शिळे जेवण दिल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.आमदार गायकवाड यांनी उपहारगृहातील कर्मचाऱ्याला शिळ्या अन्नाच्या मुद्द्यावरून मारहाण केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ‘अजंता केटरर्स’ या कंत्राटदाराचा परवाना निलंबित करण्यात आला.
‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. ९ जुलै) सकाळी आमदार निवासातील उपहारगृहाची पाहणी केली. या पाहणीत ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६’ आणि ‘अन्न सुरक्षा आणि मानके (अन्न व्यवसायाचा परवाना आणि नोंदणी) नियम, २०११’ यांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने परवाना निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला आहे.
चार तास तपासणी, अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत
अन्न सुरक्षा अधिकारी आर. एस. बोडके यांच्या नेतृत्वाखालील एफडीएच्या पथकाने उपहारगृहाची कसून तपासणी केली. हा अधिकाऱ्यांच्या पथकाने सुमारे चार तास स्वयंपाकघर, अन्न साठवणुकीची जागा आणि इतर परिसराची पाहणी केली.या कारवाईदरम्यान, तपासणीसाठी अन्नपदार्थांचे नमुने गोळा करण्यात आले.हे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.