पिंपरी : हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे गुरुवारी (दि. 10) दुपारी पावणेदोनला बैठक होणार आहे. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास राज्यमंत्री, खासदार, आमदार, पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका, पीएमआरडीए व पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग व एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडीमुळे हजारो अभियंते त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात कोंडीत आणखी भर पडत आहे. हिंजवडी परिसर पूर्णपणे जलमय होत आहे. त्या भागांत रस्ते, रिंगरोड, उड्डाणपूल, सार्वजनिक वाहतूक, पार्किंग यंत्रणा यावर तातडीने काम होणे गरजेचे आहे. त्याबाबत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार शंकर जगताप, महेश लांडगे यांनी मुद्दा उपस्थित केला होता.
त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यांचे विस्तार, नव्या जोडरस्त्यांची निर्मिती, उड्डाणपूल, सार्वजनिक वाहतूक व पार्किंगची व्यवस्था यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांचे अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.