मुंबई : सायबर गुन्ह्यातील फसवणुकीचे पैसे दुसऱ्याच्या बँक खात्यात वळते करून काढण्यात येतात. आता हे पैसे काढण्यासाठी खातेधारकांना सहली आणि मेजवानीचे आमिष दाखवले जात असल्याचे समोर आले आहे. उत्तर सायबर पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींच्या चौकशीतून ही माहिती उघडकीस आली आहे.

मुंबई पोलिसांच्या उत्तर सायबर विभागात २० लाख रुपयांच्या फसवणुकीचा एक गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. कंबोडियामधील सायबर भामटे विविध योजनांचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करीत होते. या दोन आरोपींकडे नागरिकांची बँक खाती मिळविण्याचे काम देण्यात आले होते. सायबर फसवणुकीत आलेली रक्कम अशा बँक खात्यात वळविण्यात येते. ही बँक खाती कुणाची आणि कशी मिळवली याबाबत तपास करताना पोलिसांना एक नवीन माहिती मिळावली.

सहलीचे आमिष दाखवून दिशाभूल

पूर्वी बनावट कागदपत्रांच्या आधारे आणि नागरिकांना कमिशन देऊन बॅंक खाती उघडली जात होती. मात्र त्यामध्ये धोका होता आणि पकडले जाण्याची शक्यता होती. त्यामुळे आरोपींनी आता नवीन शक्कल लढवत आहेत. नागरिकांना हॉलीडे पॅकेजची ऑफर देण्यात येते. कंपनीच्या नावाने विशेष योजना असून त्याअंतर्गत महाबळेश्वर, खंडाळा आदी ठिकाणी दोन – तीन दिवसांच्या सहलीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येते.