नवी दिल्ली/मुंबई : महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येक मराठी मनासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. केंद्र सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय विभागामार्फत महाराष्ट्रातील १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा नामांकन यादीत समावेश करण्यात आला आहे.
या यादीत समाविष्ट झालेले किल्ले
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ शिवनेरी, राजगड, रायगड, प्रतापगड, पन्हाळा, साल्हेर, लोहगड, खांदेरी, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जिंजी. या सर्व किल्ल्यांचा थेट संबंध छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासन, युद्धनीती व स्वराज्य स्थापनेच्या कार्याशी आहे.
या ऐतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची जागतिक स्तरावर नोंद झाली असून, मराठी माणसाचा सांस्कृतिक व ऐतिहासिक अभिमान अधिकच उंचावलेला आहे. या किल्ल्यांच्या युनेस्को यादीत समावेशामुळे भविष्यात पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच या वास्तूंचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार होण्यास मदत होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी उभारलेले किल्ले हे केवळ भारताच नव्हे तर जगासाठीही प्रेरणास्थान ठरणार आहेत. राज्य सरकार व केंद्र सरकारच्या या संयुक्त प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत असून, हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाचे पर्व ठरले आहे.
स्वराज्य निर्मिती आणि ते टिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले वैभव उभारले. शत्रूला न दिसणारे दरवाजे व किल्ल्यांच्या माची स्थापत्य हे मराठा स्थापत्य शास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. हे माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यात दिसून येत नाही माजी स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्ध कौशल्याचा मुत्सद्दीनीतीन रचलेला भाग आहे. हेच अद्वितीय वैश्विक मूल्य आहे. देशभरातील शिवभक्तासाठी आजचा आनंदाचा क्षण साकारला गेला आहे मी महाराष्ट्रातील सर्वांच्या मनापासून अभिनंदन करतो. देवेंद्र फडणवीस – मुख्यमंत्री



