मुंबई | मराठ्यांच्या अभिमानाचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ ऐतिहासिक किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याने महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. या ऐतिहासिक यशानिमित्ताने मुंबईतील विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून महाराजांना विनम्र अभिवादन केले.
या अभिवादन सोहळ्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच मंत्रिमंडळातील अनेक सदस्य, आमदार, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराजांच्या स्मारकापुढे सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या दूरदृष्टी, धैर्य, आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचे स्मरण केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की “या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झालेला समावेश हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव जपण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. हे किल्ले म्हणजे केवळ दगडांचे बांधकाम नसून, मराठी स्वाभिमानाचे, शौर्याचे आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, हे यश सर्व जनतेचे आहे. या किल्ल्यांमुळे महाराष्ट्राची ओळख अधिक ठळक झाली असून, आगामी काळात या ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जातील.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावेळी आपली भावना व्यक्त करत म्हटले, शिवरायांनी घडवलेल्या गडकोटांमध्ये त्यांच्या विचारांची, धोरणांची आणि दूरदृष्टीची अमूल्य ठिणगं आहे. जागतिक स्तरावर या वारशाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे, याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले हे १२ किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला मिळालेली आंतरराष्ट्रीय मान्यता आहे. राज्य सरकारने या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी व जागतिक पर्यटनदृष्टिकोनातून त्याचा विकास करण्याचा संकल्प या कार्यक्रमातून व्यक्त केला.