पिंपरी चिंचवड | १६ जुलै २०२५
पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक झोपडपट्टी हटवण्यासाठी आज सकाळपासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई सुरू केली आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर झोपड्या, अनधिकृत बांधकामे आणि दुकाने उभारलेली होती. याठिकाणी प्रस्तावित विकसन प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसर खाली करण्याचे आदेश महापालिकेने दिले होते.

झोपडपट्टी पुनर्विकासासाठी मोठ्या बिल्डरचा पुढाकार
सूत्रांच्या माहितीनुसार, थेरगाव येथील एका नामांकित बिल्डरने काळाखडक परिसरात मोठ्या विकास प्रकल्पासाठी जागा घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण झोपडपट्टी हटवून हे क्षेत्र मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने महापालिकेने स्थानिक रहिवाशांना यापूर्वीच स्थलांतरासाठी नोटिसा बजावल्या होत्या.

काहींनी स्थलांतर स्वीकारले, काहींचा अजूनही विरोध
काही नागरिकांनी स्वखुशीने स्थलांतर केले आहे, मात्र काहींनी अद्याप आपली घरे सोडलेली नाहीत. त्यामुळे आज १६ जुलै रोजी सकाळी ८ वाजल्यापासून अतिक्रमण विभाग, महापालिका कर्मचारी, आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा काळाखडक येथे दाखल झाला आहे.
रस्त्यालगतच्या दुकानदारांवर पहिली कारवाई
कारवाईच्या पहिल्या टप्प्यात मुख्य रस्त्यालगत असलेली सर्व दुकाने हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्तात कारवाई शांततेत पार पडत असून, स्थानिक नागरिकांमध्ये मात्र काही प्रमाणात अस्वस्थता आणि नाराजी पाहायला मिळत आहे.
कारवाईमुळे आपली निवास जागा गमावणाऱ्या काही नागरिकांनी नाराजी व्यक्त करत म्हटले की, “आम्हाला पर्यायी निवास देण्याची हमी मिळाल्याशिवाय ही कारवाई अन्यायकारक आहे.” तर दुसरीकडे, काही नागरिकांनी याला पाठिंबा देत परिसराचा विकास होण्याच्या दृष्टीने ही कारवाई योग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.
पुढील टप्प्यांमध्ये संपूर्ण परिसर हटवण्याचे संकेत
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने संकेत दिले आहेत की, येत्या काही दिवसांत उर्वरित झोपडपट्टी हटवून संपूर्ण काळाखडक परिसर साफ करण्यात येणार आहे, जेणेकरून नियोजित विकास प्रकल्प राबवता येईल.
अधिकृत प्रतिक्रिया आणि स्थानिक प्रशासनाकडून पुढील निर्णयांची प्रतीक्षा करण्यात येत आहे. कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे.
अधिक अपडेट्ससाठी संपर्कात रहा.




