मुंबई | १६ जुलै २०२५
मुंबई उपनगरातील नालासोपाऱ्यातून कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास विजयनगर परिसरात सितारा बेकरीजवळ दोन वाहतूक पोलिस हवालदारांना एका बाप-लेकाने भरदिवसाचं आणि भररस्त्यावर बेदम मारहाण केली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडवून दिली आहे.
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्यात संबंधित बाप-लेक रस्त्यावर ड्युटीवर असलेल्या दोन वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करताना आणि मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहेत. पोलिसांच्या गणवेशाचीही काही प्रमाणात नासधूस झाल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट आहे.
कायद्याच्या धाकावर प्रश्नचिन्ह
भररस्त्यावर, लोकांच्या उपस्थितीत पोलीस कर्मचारीच असुरक्षित असल्याचे या घटनेतून दिसून येते. कायद्याच्या रक्षकांवरच अशा पद्धतीने हात उचलणं हे अत्यंत गंभीर असून, शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या ढासळलेल्या परिस्थितीवर ही घटना मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करते.
स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी बाप-लेकाला ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणे, आणि मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक चौकशी सुरू असून, पोलिसांचे म्हणणे आहे की वाहतूक नियम उल्लंघनावरून वाद निर्माण झाला आणि त्याचेच रूपांतर मारहाणीत झाले.
नालासोपाऱ्यातील ही घटना केवळ दोन पोलिसांवरील हल्ला नसून, ती शासनव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर झालेला थेट आघात आहे. अशा घटना रोखण्यासाठी आणि पोलिसांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावी, अशी मागणी आता सर्व स्तरांतून केली जात आहे.



