पिंपरी : शहराच्या हरित पट्ट्यातील एक अत्यंत आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संभाजीनगर चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यानात दररोज संध्याकाळी ७:३० वाजता लेझर शो आयोजित केला जातो. या लेझर शोला पाहण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.
निसर्गाच्या सान्निध्यात रंगीबेरंगी प्रकाश, ध्वनी आणि खास व्हिज्युअल इफेक्ट्ससह सादर होणारा हा शो प्रेक्षकांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे. विशेषतः लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच या शोचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे.
बर्ड व्हॅली उद्यानामध्ये असलेल्या सरोवर, पक्ष्यांचे नैसर्गिक वास्तव्य आणि हरित परिसर यामुळेच हे ठिकाण आधीपासूनच लोकप्रिय होते. आता लेझर शोमुळे याचे आकर्षण अधिकच वाढले आहे. शहरातील नागरिकांनी महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे स्वागत केले असून, अशा उपक्रमांमुळे पर्यावरणाविषयी जनजागृती तर होतेच, पण नागरिकांना सायंकाळच्या वेळेस एक उत्तम पर्यायही उपलब्ध होतो, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवावा आणि भविष्यात आणखी सुधारणा कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.




